लाखो रूपयाचे सागवान तस्करांच्या घशात
पांढरकवडा - पांढरकवडा वन विभागाअंतर्गत येत असलेल्या पाटणबोरी रेंज मध्ये हजारो सागवान झाडांची अवैध रित्या कत्तल झाली असुन सागवान तस्करांनी लाखो रूपये किंमतीचे सागवान जंगलातुन रातोरात कटाई करून चोरून नेले आहे. सागवान तस्करांशी रेंज च्या अधिकाय्रांचे अर्थपुर्ण संबंध असल्याने पाटणबोरी येथील रेंजर या गंभीर प्रकरणाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करित असल्याचा आरोप भाजपाचे तालुका सचिव अनिरूध्द बडवे यांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच भाजपा व भाजयुमोच्या तालुका पदाधिकाय्रांनी जंगलात जावुन सागवान कटाईचे छायाचित्रण करून कटाईच्या प्रमुख दृश्यांची एक सिडी पुराव्यानिशी यवतमाळ येथील मुख्य वनसंरक्षक रामानुज चौधरी यांचेकडे सुपुर्द केली असुन तक्रार दाखल केली आहे. चौधरी यांचे कडुन या प्रकरणाची ७ दिवसाचे आत चौकशी केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. पांढरकवडा वन विभागातील लाखो रूपये किंमतीचे सागवान कटाईचे मोठे प्रकरण उघडकिस आल्याने वन विभागात एकच खळबळ माजली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की पाटणबोरी रेंज मधिल मांडवी, निंबादेवी खैरी धरमगोटा, सुकही वडवाट कोदोरी कारेगांव व पाटणबोरी बिट मधिल जंगलांमध्ये हजारो सागवान झाडांची कटाई सागवान तस्करांनी केली आहे. परंतु पाटणबोरी येथील रेंजर यांचे सागवान तस्करांसोबत मैत्रीपुर्ण व अर्थपुर्ण संबंध असल्याने ते या प्रकरणाकडे हेतुपुरस्सर दुलर्क्ष करीत आहेत. पाटणबोरी रेंज मधिल जंगल नष्ट होण्याचे मार्गावर आले असुन पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच भाजपाचे तालुका सचिव अनिरूध्द बडवे, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष राहुल चिंतावार तालुका सरचिटणीस धनंजय ठाकरे, प्रितम नरांजे, सुभाष दरणे, प्रफुल सोयाम, रवि उईके यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी जंगलात भेटी दिल्या असता मोठ्या प्रमाणात सागवानाची कटाई आढळुन आली. या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून संबंधीत भ्रष्ट अधिकाय्रांवर योग्य कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे पाटणबोरी येथील रेंजर यांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांना तात्काळ सेवेतुन बडतर्फ करावे अन्यथा भाजपा व भाजयुमो तिव्र आंदोलन छेडेल असा ईशारा अनिरूध्द बडवे, राहुल चिंतावार यांनी दिला आहे.